व्यासंगी आणि साक्षेपी संशोधक डॉ. य.दि.फडके यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे मौल्यवान विश्लेषण पुढील पिढयांसाठी करून ठेवले आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक संपदेत भर घालणारया या संशोधनाची परंपरा डॉ. फडके यांच्या निधनानंतरही चालू राहावी, य उद्देशाने ट्रस्टने डॉ. य.दि.फडके प्रगत संशोधन केंद्र २००८ पासून सुरू केले आहे.
महाराष्ट्राला परिवर्तनवादी सामाजिक चळवळींची परंपरा आहे, तसेच राजकीय विचारधारांच्या वादप्रतिवादाचाही वारसा आहे. ही परंपरा आणि वारसा पुढे नेणा-या राज्यभरातील सक्षम व्यक्तींची निवड करून विविध महत्त्वाच्या विषयांवरील संशोधनपर दस्तावेज तयार व्हावेत, त्यासाठी संबंधित व्यक्तींना सर्व प्रकारचे सहाय्य व उत्तेजन मिळावे, या हेतूने संशोधनवृत्ती देण्याचे काम या केंद्रामार्फत केले जाते.
या संशोधनवृत्तीतून दरवर्षी संदर्भमूल्य असलेली संग्राह्य पुस्तके प्रकाशित करण्याचेही ठरले असून त्यानुसार विविध विषयांवर अनेक संशोधन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. विशेष करून वंचित समाजघटकांतील गुणी व्यक्तींच्या संशोधनकार्यास चालना मिळावी, यासाठी दिवंगत पुरोगामी संशोधक व सत्यशोधक कार्यकर्ते मनोहर कदम यांच्या नावे दरवर्षी एक संशोधनवृत्तीही या केंद्रामार्फत दिली जाते.
केंद्रातर्फे महेश सरलष्कर याचे `शेतकरी ग्राहक आणि महागाईचे त्रैराशिक ' हे पहिले संशोधनपर पुस्तक प्रसिद्ध झालं आहे.
समाजवादी चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते माधव साठे यांच्या स्मृत्यर्थ याच संशोधन केंद्राअंतर्गत `माधव साठे डॉक्युमेंटेशन सेंटर ` सुरू करण्यात आले आहे.
नक्षलवाद - माओवाद, दहशतवाद, भाववाढ, राखीव जागा अशा काही विषयांचे संदर्भ साहित्य जमवण्याचे काम सुरू आहे.
वेळ – सोमवार ते शुक्रवार दुपारी १२ ते सायंकाळी ६ |